Saturday, February 9, 2008

मन तळ्यात..

शनिवारचि संध्याकाळ.. मन आधीच होते उदास... का कुणास ठाऊक.. पण खुप वैताग आला होता.. नैराश्याचे सावट पसरले होते.. शेवटि म्हटले घराबाहेर पडुन बघु.. असच फिरता फिरता अचानक त्या तळ्याची आठवण झाली.. भले मोठे तळे.. पुर्णत: नैसर्गिक.. शेतमळ्यांनी वेढलेले.. कमळफुलांनी सजलेले.. द्त्तमंदिराच्या मागच्या बाजुस विसावलेले.. तळ्याशी आणेपर्यंत स्वागत करणार्‍या त्या इटुकल्या पिटुकल्या पाउलवाटा... सारे काहि मस्त.. मुंबईतल्या आवाज कल्लोळात लोप पावलेली शांतता इथे हमखास घर करुन बसलेलि... आमच्या बोरिवलि पश्चिमेला ह्या निसर्गमय भागाने स्वता:ला वेगळेसे करुन घेतले होते.. ते तळे सदैव भरलेले.. त्यामुळे आजुबाजुचे शेतमळेदेखिल फुललेले.. थोडे शहरि भागाच्या एका टोकाला पडल्यामुळे तळ्यावर निर्माल्य अशा गोष्टिंचा कधिच हल्ला झाला नव्हता.. त्यामुळे तितकेच स्वच्छ.. अशा तळ्यात डुबकि मारणारा जरा जास्तिच आहारि जाण्याची शक्यता.. त्यामुळेच कि काय.. आतापर्यंत ६० -७० जण तरि दगावले असतिल.. तरिदेखिल या तळ्याचि ख्याति एक शांतभोर नि सुंदर अशीच.. तळे किति खोल असावे याची कल्पना त्या तळ्यात वास्तव्य करुन असलेल्या मासे, पाणसाप या जलचर जीवांनाच माहित.. या तळ्याला लागुनच असलेले शेतमळे ओलांडले कि मग आंबे चिंचा इं झाडांची रेलचेल लागते.. नि बर्‍यामोठ्या प्रमाणात रानाने वेढलेला परिसर.. आम्हि कॉलेज-शाळेला सुट्टि पडलि कि जेवल्यानंतर आम्हि इथे सायकलि घेउन हमखास यायचो.. जवळपास जिकडे भलिमोठी वृक्षाची सावलि असेल तिकडे मग ठाण मांडायचो.. चकाट्या पिटायला ..सोबतिला पत्त्यांचा खेळ.. फार मजा यायची.. काहि मैलांवरच खाडि असल्याने वाहणारा वाराहि मस्तपैकि झाडांच्या पानांशी, उभ्या गवताशी वाद घालायचा.. या सळसळत्या आवाजाच्या जोडीला शेतिसाठी लावल्या जाण्यार्‍या पंपाचे पार्श्वसंगित ठरलेले..ते क्षण आठवताच चालण्याचा वेग वाढवला.. म्हटले बघुया तरी जाउन.. तसे म्हणा आम्हि जिकडे ठाण मांडायचो तिथे जाणे आता शक्य नव्हते.. अशी अफाट मोकळी जागा.. एका टोकाला.. मग काय कुणाची नजर कशी नाही ती पडणार.. जमिनमालकांनी जागा विकल्या नि आता तिथे भव्य दिव्य "एस्के" नावाचा क्लब उघडलाय.. वाटले होते तळे पण यांच्याच ताब्यात जाणार.. पण तसे काहि घडले नाहि ते नशीब.... उलट त्या क्लब कडे जाणारा रस्ता हा तळ्याला अगदी बिलगुन होता.. शिवाय दोन्ही बाजुस नारळांची झाडे लावल्याने त्या झाडांची एक माळ या तळ्याला मिळाली होती.. तेवढीच काय ती सजावट.. पण छान दिसायचे.. रस्त्याच्या एका बाजुला हे तळे.. दुसर्‍या बाजुस घनदाटझुडुपे नि झुडुपांत लपलेली खाडी.. पाण्यात दिसणारी ती माळ तर सुंदरच.. भव्य वर्तुळार्कुती मध्ये असलेले हे तळे.. एका बाजुस हि माळ, एका बाजुस किनारा.. नि इतर बाजुस रानटि वनस्पतिंचे कुंपण.. आज बरेच दिवसांनी जात होतो... पण घडलेला बदल पाहुन धक्काच बसला.. पुर्वि द्त्तमंदिरापर्यंतच वाहतुकीचा रस्ता होता.. आता मात्र मंदिरापुढील झाडि हटवुन मोठा रस्ता झालाय.. अगदि हायवे सद्रुश्य.. तो रस्ता जणु काहि शहरि भागाचि बॉर्डर म्हणुनच वाटतो.. भरधाव जाणार्‍या गाड्या नि रस्ता ओलांडला कि मंदिर लागते.. द्त्तगुरुंचे दर्शन घेतले नि लागलिच तळ्याकडे वळालो.. पण आता तशा पाउलवाटा कधीच पुसल्या गेल्या होत्या.. म्हटले रस्त्याच्याच कडेने जाउ.. अगदि थोडेसे अंतर गाठले नि तळ्याचे दर्शन झाले.. विश्वासच बसला नाहि..हेच का ते तळे ?? ?? झाडे शेतमळ्यांनी छानपैकी सजलेले तळे आज विवस्त्र झाले होते... जसा तळ्याच्या समिप गेलो तेव्हा चारी बाजुंनी भरीव टाकुन रुंदि कमी करण्यात आलि होती.. सर्व कडा मातीचा रतिब घालुन सपाट केला होता... तेव्हाच तळ्यावर हल्लाबोल झाल्याचे लक्षात आले.. एरवि शेतपाण्यासाठि वापरण्यात येणारा पंप एका कडेला पडला होता.. पाणी उपसुन उपसुन दमला असावा कदाचित..!! .. आजु बाजुस असलेल्या शेतमळयांचे अस्तित्व आता फक्त काहि उरल्या सुरल्या कोपर्‍यातच उरले होते.. हे सगळे पाहुन मन खटु झाले.. कुण्याच्या डोक्यात असा विचार तरी कसा यावा.. ही तर नैसर्गिक खजिन्यावरील आपत्ती होती.. तिकडच्या त्या माळेतील काहि झाडेहि गळुन पडली होती..!! त्यांचे नशिब ती क्लबवाल्यांच्या रस्त्यावर होती म्हणुन बचावली..एवढेच.. इतके सारे होउनहि ते तळे खुपच शांत वाटत होते.. अफाट शांतता होती.. पाणीही स्तब्ध.. अधुन मधुन माश्यांच्या हालचालिमुळे फक्त तरंग निर्माण होत होते..
याचवेळी त्या "माळे"च्या दुसर्‍या बाजुस नजर पडलि.. जंगल, झुडुप गुल्ल..! चक्क पठारी प्रदेश झाला होता.. नावाला दोन मरगळलेली आंब्याची झाडे होति... मग तिकडे वाटचाल केलि.. म्हटले पाहुया तरि किती आत जाता येते.. जसा आत जात गेलो तसा वार्‍याचा वेग वाढत गेला.. कानात वार्‍याचे गुंजन चालु झाले.. आकाशात अधुन मधुन घरि परतणार्‍या बगळ्यांचे बाण दिसत होते.. !! क्षणभर थांबलो नि मागे वळुन पाहिले तर मावळत्या सुर्य प्रकाशात दुरवर लांबलचक डोंगररांगा भासाव्या अशा इमारती नारिंगी रंगाने माखल्या होत्या..!! तिथेच दुरवर काहि पोर क्रिकेट खेळताना दिसलि..!! व्वा काय जागा शोधलि होती... कुणाचा अडथळा नाहि वा कुणाची भिती नाहि.. खाडिला लागुन खेळ चालु होता..!! तेच शेवटचे टोक असावे.. कारण पुढे खाडिच्या बॉर्डरवर आढाळणारी खारफुटिची झुडुपे होती.. उद्या ती पण गायब नाही झालि तर नवलच.. उदया परवा इथे पण मोठी वस्ती उभी राहिल..!!
बस्स तिकडुनच माघारी फिरलो.. अंधारहि पडत होता.. पुन्हा एकवार त्या तळ्यापाशी गेलो नि जवळच असलेल्या खडकावर शांत बसून क्षणभर मुकरित्या शोक व्यक्त केला.. त्या एकांतवासात बर्‍याच गतआठवणी जागृत झाल्या.. नि जड अंतःकरणाने घराची वाट धरलि.. पण निघताना तळ्याला रोज नाहि पण एक -दोन आठवड्यांनी भेट देत जाईन असे मुक्यानेच वचन दिले.. काय करणार ह्या सोबतिची पण काहि काळाने तूट होणार हे संकेत कधीच मिळाले होते.. तसे न घडो हिच सदिच्छा...!!